Unhali Bhuimug Lagwad: शेतकरी मित्रांनो, आजच्या ह्या लेखात आपण उन्हाळी भुईमूग लागवडीबद्दल (Unhali Bhuimug Lagwad) संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
भुईमुग हे सर्वात जुने तेलबिया पीक असून, भुईमुगास क्वीन ऑफ ऑइल सिड्स म्हणजेच तेलबिया पिकांची राणी असे संबोधले जाते. भुईमूग हे तिन्ही हंगामात घेतले जाणारे पीक असले तरी हे पीक महाराष्ट्रात व देशात सर्वच भागांत प्रामुख्याने खरिपात घेतले जाते. परंतु खरीप हंगामापेक्षा उन्हाळी हंगामात भुईमुग पिकाची उत्पादकता जास्त असल्याने, उन्हाळी भुईमुग लागवडीकडे शेतकऱ्यांचा जास्त कल दिसून येतो.
भुईमुगाची खरीप हंगामातील उत्पादकता सुमारे 1000 किलो तर उन्हाळी हंगामात 1400 किलो प्रति हेक्टरी आहे. त्यामुळे उन्हाळी हंगामात भुईमुग लागवड {Unhali Bhuimug Lagwad} मोठ्या प्रमाणावर दिसुन येते.
Unhali Bhuimug Lagwad
मागील काही वर्षांपासून भुईमूगाला मिळत असलेला कमी भाव, मजुरांची कमतरता, उन्हाळ्यात पाण्याची उपलब्धता या कारणांमुळे शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर उन्हाळी भुईमूग पिकाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येईल. तसेच सोयाबीन, सूर्यफूल, पामतेल इत्यादी तेलबिया पिकांचे पर्याय उपलब्ध झाल्यानेसुद्धा उन्हाळी भुईमूग लागवडीखालील क्षेत्रात घट झाली आहे.
असे असूनही दिवसेंदिवस तेलाची मागणी वाढत असल्याने भुईमूग लागवड फायदेशीर ठरू शकते. तर उन्हाळी भुईमूग लागवडीचे पेरणीपासून काढणीपर्यंतचे संपूर्ण नियोजन कसे करावे? हे आपण पाहुयात.
भुईमूग लागवडीसाठी जमीन
मित्रांनो, भुईमूग हे पीक मध्यम, पाण्याचा चांगला निचरा असलेल्या, मऊ, भुसभुशीत व सेंद्रिय पदार्थ असलेल्या जमिनीत चांगले येते. खूप भारी, चिकट व कडक होणाऱ्या जमिनीत शेंगाची वाढ चांगली होत नाही. तसेच शेंगा खुडण्याचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात पाणी द्यावे लागत असल्याने जमीन समपातळीत असणे आवश्यक आहे. जमीन तयार करताना नांगरणीची खोली साधारणत: फक्त 12-15 सें.मी. एवढीच राखावी.
जास्त खोल नांगरणी केल्यास जमिनीत शेंगा जास्त खोलीवर लागतात. पीक परिपक्वतेनंतर झाडे उपटताना अथवा वखराद्वारे काढताना आऱ्या तुटून शेंगा जमिनीत राहतात. परिणामी उत्पादनात घट येते. तसेच भुईमुगाच्या लागवडीसाठी भुसभुशीत जमिनीची निवड करावी कारण भुसभुशीत जमिनीत भरपूर प्रमाणात हवा खेळती राहते. त्यामुळे मुळांची चांगली वाढ होऊन आऱ्या सुलभ रीतीने जमिनीत जाण्यास तसेच शेंगा पोसण्यासाठी मदत होते. तसेच शेवटच्या वखरणी किंवा रोटाव्हेटर मारण्यापूर्वी चांगले कुजलेले शेणखत सुमारे 2 टन प्रतिएकर याप्रमाणे द्यावे. जमिनीचा सामू 6.5 ते 7.5 दरम्यान असावा.
भुईमूग लागवडीसाठी हवामान
शेतकरी मित्रांनो, भुईमुग हे उष्ण व समशीतोष्ण कटिबंधातील पीक आहे. या पिकास भरपूर सूर्यप्रकाश व उबदार हवामान पीकवाढीच्या दृष्टीने उपयुक्त असते. मात्र पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असावे व फुलोरा अवस्थेदरम्यान या पिकाला दिवसाचे तापमान साधारणत: 24 ते 25 अंश सेल्सिअस लागते; अन्यथा फुलधारणा क्षमतेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट येते.
तापमान व भुईमूग वाढीचा घनिष्ट संबंध आहे. तापमान सतत ३३ अंश से. पेक्षा जास्त असल्यास परागकणांच्या जीवनक्षमतेवर परिणाम होतो. म्हणून पेरणीची वेळ अतिशय महत्वाची आहे.
भुईमूग लागवडीसाठी पूर्वमशागत
जमिनीचा कमीत कमी 20 से.मी. थर भुसभुशीत करणे आवश्यक आहे. यासाठी 6 ते 12 इंच खोल नांगरटी नंतर उभी आडवी वखरणी करावी. शेवटच्या वखराच्या पाळी पूर्वी हेक्टरी 7.5 टन चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळावे.
सरी वरंबा पद्धतीने लागवड करावयाची असल्यास वरंबा चार ओळीचा असावा. फवारा पद्धतीने पाणी देण्याची सोय नसल्यास सरी वरंबा दोन ओळीचा असावा.
उन्हाळी भुईमूग पेरणीची योग्य वेळ
मित्रांनो, उन्हाळी भुईमुगाची पेरणी (Unhali Bhuimug Lagwad) थंडी कमी झाल्यावर 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान करावी. पेरणीच्या वेळी रात्रीचे किमान तापमान 18 अंश सेल्सिअस किंवा त्यापेक्षा जास्त असावे.
पेरणीसाठी बियाण्याचे प्रमाण
शेतकरी बंधुनो, पेरणीकरिता वाणानुसार सुमारे 100 ते 125 किलो प्रति हेक्टरी बियाणे लागते. परंतु, बियाण्याचे प्रमाण ठरविताना पेरणीकरिता निवडलेला वाण, हेक्टरी रोपांची संख्या, उगवणक्षमता व पेरणी अंतर आदी बाबींचा विचार करावा.
भुईमूग लागवडीसाठी सुधारित वाण
मित्रांनो, उन्हाळी भुईमुगाचे अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित वाणांची निवड केली तर उत्पादनात 35-40 टक्क्यांनी वाढ होते, उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी सुधारित वाणांची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी 👉 येथे क्लिक करा.
उन्हाळी भुईमूग लागवडीसाठी सुधारित वाण
भुईमूग पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया आवश्यक
रोपावस्थेत उद्भवणाऱ्या रोगांपासून संरक्षण करण्यासाठी पेरणीपूर्वी प्रति 10 किलो बियाण्यास 50 ग्रॅम थायरम किंवा 50 ग्रॅम ट्रायकोडर्मा हे जैविक बुरशीनाशक बियाण्यास चोळावे. नंतर 10 किलो बियाण्यास प्रत्येकी 250 ग्रॅम रायझोबियम आणि स्फुरद विरघळणाऱ्या जिवाणूसंवर्धकाची प्रक्रिया करून बियाणे सावलीत वाळवून मगच पेरणीसाठी वापरावे. त्यामुळे पिकाच्या मुळावर भरपूर गाठी येतात व हवेतील नत्र अधिकाधिक शोषून घेण्यास मदत होते.
बियाणे पेरणीच्या अगोदर 24 तास भिजवत ठेवल्यास बियाण्याची उगवण क्षमता वाढते. बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात साधारणतः 15 टक्के वाढ होते. बीजप्रक्रिया करताना बियाण्यावर प्रथम रासायनिक बुरशीनाशकाची व नंतर जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया करावी.
पेरणीतील अंतर
मित्रांनो, उपट्या जातीसाठी 30×10 सें.मी. तर निमपसऱ्या जातीसाठी 30×15 सें.मी. पेरणीतील अंतर ठेवावे. तसेच भुईमुगाची सपाट वाफा पद्धतीने पेरणी करावयाची झाल्यास पेरणीयंत्राच्या साह्याने दोन ओळींतील अंतर 30 सेंमी व दोन रोपांतील अंतर 10 सेंमी ठेवावे.
जेणेकरून हेक्टरी 3.33 लाख इतकी रोपांची संख्या ठेवता येईल. टोकण पद्धतीने लागवड केल्यास बियाण्याची 25 टक्के बचत होते. पेरणीच्या वेळी बारीक बियाणे बाजूला काढणे शक्य होऊन प्रतिहेक्टरी 3.33 लाख रोपे मिळतात. पेरणी पाच सेंमी खोलवर करावी.
पेरणीची पद्धत
भुईमुगाची पेरणी सपाट वाफ्यावर किंवा रुंद सरी वरंबा पद्धतीने करता येईल. भुईमुगाची पेरणी सपाट वाफ्यावर करायची झाल्यास 30 सेंमी अंतर असलेले पेरणीयंत्र वापरून वाफशावर पेरणी करावी किंवा बियाणे टोकून पेरणी करावी. पेरणीसाठी दोन ओळींतील अंतर 30 सेमी तर दोन रोपांतील अंतर 10 सेमी ठेवावे व पाणी द्यावे. त्यानंतर 7-8 दिवसांनी न उगवलेल्या जागी नांग्या भरून घ्याव्यात.
भुईमूगास रासायनिक खते कशी द्यावीत?
भुईमुगास नत्र व स्फुरद ही महत्त्वाची अन्नद्रव्ये आवश्यएक असतात. उन्हाळी भुईमुगासाठी 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद, 400 किलो जिप्सम असे प्रमाण ठेवावे. त्याचबरोबर गंधक व कॅल्शिअम ही दुय्यम अन्नद्रव्ये भुईमुगासाठी द्यावी लागतात. स्फुरदयुक्त खते सिंगल सुपर फॉस्फेट द्वारे दिल्यास त्यामध्ये असलेल्या गंधकाचा भुईमुगासारख्या पिकास चांगला फायदा होतो.
पेरणीच्या वेळी 200 किलो जिप्सम हे सल्फर व कॅल्शिअमची उपलब्धता करण्यासाठी जमिनीतून द्यावे, तर उर्वरित 200 किलो जिप्सम हे आऱ्या सुटताना द्यावे. जेणेकरून शेंगा लागण्याचे प्रमाण वाढते व एकूणच उत्पादन वाढते.
आंतरमशागत
मित्रांनो, भुईमुगाचे पीक 45 दिवसांपर्यंत तणविरहित ठेवण्यासाठी दोन खुरपण्या 15 ते 20 दिवसांच्या अंतराने व दोन कोळपण्या 10 ते 12 दिवसांच्या अंतराने कराव्यात. 35 ते 40 दिवसांनंतर आऱ्या सुटू लागल्यानंतर कोणतेही आंतरमशागतीचे काम करू नये. फक्त मोठे तण उपटून टाकावे म्हणजे शेंगा पोसण्याचे प्रमाण वाढेल. तणनाशकाचा वापर करून निंदणी व दोन कोळपण्या दिल्या तर तणांचा चांगला बंदोबस्त होतो.
उन्हाळी भुईमूगाचे पाणी व्यवस्थापन
शेतकरी मित्रांनो, उन्हाळी भुईमुग पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 8 ते 10 दिवसाच्या अंतराने 12 ते 13 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात. उन्हाळी भुईमुगाच्या ओलीत व्यवस्थापनासाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर फायद्याचा राहतो.
फुले येण्याच्या अवस्थेपासून म्हणजेच पेरणीपासून 22 ते 30 दिवसात ठराविक अंतरानुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. आऱ्या सुटण्याची अवस्था जी पेरणीपासून 40 ते 45 दिवसाची असते आणि शेंगा पोसण्याची अवस्था जी पेरणीपासून 65 ते 70 दिवस असते. या वेळी पाण्याची पाळी चुकवू नये. आऱ्या जमिनीत जाताना तसेच शेंगा पोसताना जमिनीतील ओलाव्याची वाफसा स्थिती राखणे आवश्यक आहे.
काढणी व उत्पादन
तर भुईमुग पिकाची पाने पिवळी पडण्यास सुरुवात झाली म्हणजे पिक तयार झाले असे समजावे. शेंगांचे टरफल टणक होते तसेच शेंगाच्या टरफलाची आतील बाजू काळी दिसू लागते. त्यावेळी पिकाची काढणी करावी.
शेंगांना असणारी माती स्वच्छ करावी. भुईमुग काढणीनंतर कडक उन्हात शेंगा चांगल्या वाळवाव्यात. त्यातील ओलाव्याचे प्रमाण 8 ते 9 टक्क्यांपर्यंत खाली आणावे आणि शेंगा पोत्यात भरून ठेवाव्यात.
उन्हाळी भुईमुगाची सुधारित तंत्रज्ञानाने लागवड केल्यास 25 ते 30 क्विंटल प्रति हेक्टरी उत्पादन मिळू शकते. आणि कधी बाजारभाव ही चांगला मिळतो, त्यामुळे उन्हाळी भुईमूग म्हणजे चांगले उत्पन्न मिळवुन देणारे पीक ठरते.
तर मित्रांनो, अशाप्रकारे आज आपण उन्हाळी भुईमूग पिकाचे सुधारीत लागवड तंत्रज्ञान (Unhali Bhuimug Lagwad) जाणून घेतले.