Maharashtra Budget 2023: राज्याचा 2023-24 या वर्षाचा 5 लाख 47 हजार 450 कोटींचा अर्थसंकल्प (Maharashtra Budget 2023) उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तर मंत्री दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेत दिनांक 09 मार्च 2023 रोजी सादर केला.
या अर्थसंकल्पानुसार महसुली जमा 4 लाख 49 हजार 522 कोटी तर महसूली खर्च 4 लाख 65 हजार 645 कोटी आहे. महसूली तूट 16 हजार 112 कोटी तर राजकोषीय तूट 95 हजार पाचशे कोटी 80 लाख रुपये इतकी आहे.
Maharashtra Budget 2023
अर्थसंकल्प सादर करण्यास सुरुवात करताच वित्तमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, देशाच्या अमृतकाळातील पंचामृतावर आधारित राज्याचा हा पहिला अर्थसंकल्प 5 ध्येयांवर आधारित आहे.
अर्थसंकल्पात ‘शाश्वत शेती- समृद्ध शेतकरी’ या घटकासाठी 29 हजार 163 कोटी, महिला, आदिवासी, मागासवर्ग, ओबीसींसह सर्व समाजघटकांच्या सर्वसमावेशक विकासासाठी 43 हजार 36 कोटी तरतूद आहे. भरीव भांडवली गुंतवणुकीतून पायाभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी 53 हजार 58 कोटी 55 लाख तरतूद, रोजगार निर्मिती, सक्षम, कुशल- रोजगारक्षम युवा यासाठी 11 हजार 658 कोटी, तर पर्यावरणपूरक विकास या घटकासाठी 13 हजार 437 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे.